मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने  अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया अद्यापही झालेली नाही. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे, असे राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्याला ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे,  त्या शाखेसाठी त्याला नावनोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रक व आवश्यक तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.  महाविद्यालयातील शिक्षक तासिका घेणार आहेत. विद्यार्थ्यांचा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश झाला नसेल तरीही पसंतीच्या शाखेत विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करता येणार आहे.