मुंबई : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धूम पाहायला मिळत आहे. देशासह राज्यात उन्हाचा कडाका जोरात आहे. भर उन्हात प्रचार सभा होत आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठी झळ बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याचाी घटना घडली होती. त्यानंतर आज यवतमाळच्या पुसद येथे भाजप नेते नितीन गडकरी यांना भोवळ आली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आल्याने त्यांना लगेच येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या पुसद येथील सभेमध्ये स्टेजवर बोलत असताना मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. गडकरी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी पुसदमध्ये आले होते. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून काही वेळात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.

सध्या विदर्भात उन्हाचा पारा ४२ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त जात असून या उष्णतेमुळेच गडकरींना भोवळ आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान भोवळ आल्यानंतर काही वेळातचं गडकरींना बरं वाटयाला लागताच ते पुन्हा भाषणासाठी मंचावर आले आणि त्यांनी सभेसला संबोधित केलं.