इंदौर (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोनदरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला. इंदौरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ५० ते ५५ प्रवासी होते. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचे मृतदेह आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. कोसळलेली बस नदीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.

खालघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचे नियंत्रण सुटले, असे सांगण्यात आले. चालकाचा तोल गेला आणि बस कठडे तोडून नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच खालघाटासह आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. इंदौर आणि धार येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हा पूल जुना असल्याचे सांगितले जाते. बस महाराष्ट्र राज्य परिवहनची आहे. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याचे आदेश दिले आहेत.

आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदौरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील ही एसटी बस सकाळी सातच्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती, इंदूरमध्ये १२  प्रवासी चढले. नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी होते, अशी माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, इंदौरहून येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री चौहान हे इंदौर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

नर्मदा नदीमध्ये कोसळलेल्या एसटी बस अपघातात मृत्युमुखी पडेलल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी आठ जणांची ओळख पटवण्यात आतापर्यंत यश आले आहे.