कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महावितरणमधील बांडगुळी व्यवस्थेमुळे कामगारांचे शोषण होत असून शासनाकडून नवीन भरती होत असलेल्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे. अशी मागणी कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यालयावर कंत्राटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

राज्यामध्ये महावितरण मध्ये भ्रष्ट कारभार सुरू असून कंत्राटी भरतीच्या नावाखाली वीज वितरण कर्मचारी यांचे शोषण केले जात आहे. प्रशासकीय पातळीवर मंत्रालयापासून ते अधिका-यापर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार बोकाळला असून कंत्राटी कामगारापेक्षा कंपन्यांचेच भले होत आहे. कंत्राटी कंपन्या व सरकारमधील बड्या लोकांचे अर्थपूर्ण हितसंबंध असून संगनमताने कंत्राटी कर्मचा-यांची पिळवणूक केली जात आहे. उन ,वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता कंत्राटी कर्मचारी रात्र दिवस काम करत असतात.

गेल्या 15 ते 20 वर्षापासून हे कंत्राटी कामगार काम करत आहेत. शासनाने सध्या नवीन भरती प्रक्रिया सुरू केली असून यामध्ये प्राधान्याने या लोकांना समाविष्ट करून घेतले पाहिजे.राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांनी शासनाकडे केलेल्या मागण्या या योग्य असून याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतले पाहिजे. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करत असल्याने अपघात विमा सेवानिवृत्तीपोटी ग्रॅच्युयटी यासारख्या गोष्टींचा लाभ कंत्राट कामगारांना कंपनीकडून देण्याची मागणी योग्य असल्याचे शेट्टी म्हणाले.