इचलकरंजी (प्रतिनिधी) : न्याय निवाडा लोकनेता फौंडेशनच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात इचलकरंजीतील गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर आज (मंगळवार) मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढती महागाई कमी करण्याची मागणी केली. तसेच विविध मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना दिले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. परिणामी, महागाईचा उद्रेक होवून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलून महागाई आटोक्यात आणावी, अशी मागणी करत जोरदार निदर्शने केली.

या मोर्चामध्ये न्याय निवाडा लोकनेता फौंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनिता राऊत, जिल्हाध्यक्षा अरुणा जाधव, कार्याध्यक्षा कविता मकोटे, उपाध्यक्षा कविता पाटील, नंदा गायकवाड, दस्तगीर बागवान, नागेश हजारे, सतीश यड्रावे, दत्ता मांजरे, विनायक चोरगे, शालिनी बचुटे, सरला गुरव आदीसह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.