नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पीठ, साखर, तेल आणि जीवनावश्यक अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या पाकिस्तानमध्ये आता पासपोर्ट छापले जात नाहीत. कारण लॅमिनेशन पेपरची कमतरता आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे की, नागरिकांना नवीन पासपोर्ट काढण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तर पाकिस्तान सरकार याबाबत मौन बाळगून आहे.


पाकिस्तानच्या इमिग्रेशन आणि पासपोर्ट डायरेक्टरेट (DGIP) च्या म्हणण्यानुसार पासपोर्टमध्ये वापरण्यात येणारे लॅमिनेशन पेपर फ्रान्समधून आयात केले जातात. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्‍या डीजीआय अँड पीचे माध्यम महासंचालक कादिर यार तिवाना म्हणाले की, सरकार संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. “परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल आणि पासपोर्ट जारी करणे नेहमीप्रमाणे सुरू राहील.

नागरिकांचे स्वप्न भंगले

परदेशात जाण्याची योजना आखत असलेल्या हजारो पाकिस्तानींना या टंचाईचा फटका बसला आहे. जगभरातील विद्यापीठांमध्ये प्रवेशाची अंतिम मुदत गाठत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या संकटासाठी पाकिस्तान सरकारच्या अक्षमतेला जबाबदार धरले आहे.