सातारा : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी थेट लढत होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने सातारचा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर म्हयुतीमध्ये सातारच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु होती. तर आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले यांनी दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतरच उदयनराजे सातारला परतले. तर भाजपकडूनही लोकसभेच्या उमेदवारांची 12 वी यादी जाहीर केली. यामध्ये उदयनराजे यांच्या नावाचा समावेश होता. आता तर उदयनराजे यांच्यासाठी भाजपने पंतप्रधान मोदी यांची सभा घेण्याचे योजले आहे.

सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिलला कराडला जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाबाबत सध्या तयारीला वेग आला असून कराडमधील भाजपच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत मैदानाची पाहणी केली. सभेच्या नियोजनासाठी शनिवारी (20 एप्रिल) साताऱ्यात कोअर कमिटीची बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे अशी सरळ लढत होत आहे. दोन्ही बाजूकडून स्टार प्रचारकांसह दिग्गज नेत्यांच्या सभांचे जोरदार नियोजन सुरु आहे. भाजपच्या वतीने उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन केले आहे.

येत्या 30 एप्रिलला कराडमध्ये ही सभा होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरु आहे. शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी कराडमधील मैदानांची पाहणी केली. दरम्यान, शनिवारी सातारा भाजप कार्यालयात प्रदेश निवडणूक प्रभारी निर्मलकुमार सुराणा यांच्यासोबत बैठक होणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले.