कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शासनाचा कोणताही विभाग असो कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने गतिमान व्हावे, सामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कार्यालयाचे उंबरे झीजवायला लावू नका, जनता सोशिक असते म्हणून जनतेला त्रास देऊ नका अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यांनी सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.


गुरुवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, अकीवाट,अब्दुललाट व यड्राव जिल्हापरिषद मतदार संघातील 23 गावांच्या आढावा बैठका घेतल्या यावेळी ते बोलत होते, यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रलंबित कामांचा आढावा त्या- त्या गावातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याकडून घेतला.


सामान्य माणसाच्या अडचणी, शासन स्तरावर एखाद्या कामाबाबत त्यांना होणारा त्रास जाणून घ्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, व त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी मदत व सहकार्य करावे यासाठी प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण शिरोळ तालुक्यातील गावांच्या आढावा बैठका घेण्याचे नियोजन आपण केले असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.


गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या या आढावा बैठकांसाठी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते युवक मंडळी, गावागावातील ग्रामस्थ विशेषता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करीत असलेल्या महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती, एकूणच आढावा बैठकीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला,

यावेळी दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, टाकळीवाडी, घोसरवाड, अकिवाट, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, तेरवाड, हेरवाड, मजरेवाडी, बस्तवाड, अब्दुललाट, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी, यड्राव, टाकवडे, शिरढोण, जांभळी, व कोंडीग्रे या गावांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व नागरिक उपस्थित होते.