पुणे ( प्रतिनिधी ) मावळचे माजी आमदार स्वर्गीय दिगंबर भेगडे यांचा आज प्रथम स्मृतीदिन! यानिमित्त त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला प्रेरणा देत रहावे यासाठी त्यांचे कुंडमळा इंदोरी येथे स्मारक उभारण्यात आले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी स्वर्गीय दिगंबर यांच्या पुणे पदवीधर निवडणूक काळापासूनच्या आठवणींना उजाळा दिला. अतिशय नम्र असे दिगंबरदादा हे नेहमीच सर्वांना प्रेमाची वागणूक देत‌. आजच्या राज्यकर्त्यांनी यांच्या कार्यातून धडा घेण्याची गरज आहे अशी भावना याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

तसेच, स्व. आमदार दिगंबरभाऊ यांच्या निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील मावळ तालुक्यातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे याप्रसंगी पाटील यांनी आश्वस्त केले.

मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हीच स्व. दिगंबर दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही पाटील म्हणाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, राहुल कुल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.