कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिम्ससाठी उत्तम सेन्स हवा तसेच निरीक्षण कौशल्यही असायला पाहिजे. तरच उत्तम प्रकारचे मीन्स तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन अभिनेता, कंटेंट क्रिएटर सुमित पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझमच्या वर्गाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

सुमित पाटील म्हणाले, मिम्सचा उद्देश मनोरंजन आहे; परंतु त्याच्याही पलीकडे जात अलीकडे प्रमोशन्स आणि जाहिरातीसाठी मिम्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. त्यामुळे यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. विविध कंपन्यांमध्ये मिममेकर असे पद असते म्हणून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे.

ते म्हणाले,  मिम्स तयार करण्यासोबतच आशय निर्मिती खूप महत्त्वाची आहे. वैविध्यपूर्ण आशय निर्माण करता आला पाहिजे. त्यासाठी वाचन, अनुभवजन्य ज्ञान आणि निरीक्षण कौशल्य असायला पाहिजेत. शिवाय ताज्या घडामोडी आणि आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची बारकाईने नोंद ठेवली पाहिजे. अभिनयाबरोबरच संपादन कौशल्यही शिकून घेतले पाहिजे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि विविध माध्यमांचे तांत्रिक ज्ञानही समजून घेतले पाहिजे.

प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. विद्यार्थी करण शिंदे याने पाहुण्याची ओळख करून दिली. प्रणाली पाटील हिने आभार मानले.  यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ.सुमेधा साळुंखे, अभिजित गुजर, मतीन शेख, शेखर पाटील आदी उपस्थित होते.