कोल्हापूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सध्या बलत चाललं आहे. देशात प्रमुख लढतींपैकी कोल्हापूरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान, शाहू महाराज यांना अनेक संघटनांकडून पाठींबा मिळत असताना आज एमआयएमनेही शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे.

निवडणुकीत विजयी होण्यासाठी मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जातोय. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. कारण या जागेवर राजघराण्यातील शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या निवडणुकीत शाहू महाराजांची ताकद चांगलीच वाढली आहे. कारण या जागेसाठी त्यांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे. त्यांना एमआयएमचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराज यांना पाठींबा जाहीर केला.

एमएयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा
एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी आज (21 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एमआयएम पक्षाची कोल्हापूर मतदारसंघासाठीची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत, असे यावेळी जलील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुस्लीम समाज एमआयएमचा मतदार आहे. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. असे असताना एमआयएमने पाठिंबा दिल्याने एका प्रकारे शाहू महाराजांची ताकद वाढणार आहे.

वंचितचाही शाहू महाराजांना पाठिंबा
याआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज छत्रपती यांना पाठींबा दिला आहे. तर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा यासाठी मविआच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांत त्यासाठी वंचितचे आणि मविआच्या नेत्यांत अनेक बैठका झाल्या. मात्र शेवटपर्यंत या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी आता वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या मतदारसंघावर आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मात्र कोल्हापूरच्या जागेवर कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यांनी येथे छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दलित तसेच बहुजनांचाही पाठिंबा शाहू महाराजांना मिळण्याची शक्यता आहे. शाहू महाराज निवडून यावेत यासाठी महाविकास आघाडी या जागेवर एकदिलाने प्रचार करत आहे.