कोल्हापूर (विजय पोवार) : मटका व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आलेल्या मस्तीने दोन वर्षापूर्वी थेट खाकी वर्दीलाच हात घातला होता. ही मस्ती जिरवण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण राज्यातील मटका किंग गजाआड केले. पण आता कोल्हापूर जिल्ह्यात मटका व्यवसाय पुन्हा रुजायला लागला आहे. कोल्हापूर शहरात काही प्रमाणात तर ग्रामीण भागात मटका धंदा तेजीत सुरू आहे. ‘मटका चोरून सुरू आहे’ या गोंडस वाक्याखाली सुरू असणाऱ्या मटक्याची संबंधित यंत्रणेला माहितीच नसते, हे खरं म्हणजे कोणाला पटेल? 

जिल्हा पोलीस प्रमुखांनी मनात आणलं तर मटक्याची १ रुपयाचीही चिठ्ठी फाटत नाही. हे कोल्हापूरकरांनी अनुभवले आहे. अनेक जिल्हा पोलीस प्रमुखांनी हे दाखवूनही दिले आहे. शिव प्रतापसिंह यादव यांनी सुरू केलेली ही पद्धत पुढे माधवराव सानप, आर. के. पद्मनाभन, सुखविंदर सिंग यांनीही अवलंबली. डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातीलच नव्हे, तर पुण्या-मुंबईतील ही मटका किंगच्या हातात बेड्या ठोकल्या. तर काहीजण परागंदाही झाले. जिल्ह्यात मटका किंग म्हणून मिरवणारे फरार झाले. कोल्हापुरातील एक जण अजूनही पोलिसांशी लपंडाव खेळत आहे. तर इचलकरंजीतील दोन बंधू नुकतेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

असे असले तरी सध्या जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झालेला मटका धंदा पोलिसांना माहीतच नाही, असे म्हणता येईल का?  हा खरा प्रश्न आहे. ‘चोरून सुरू आहे’ असे म्हणतात तो कोणापासून चोरून हा खरा प्रश्न पडतो. कारण बुक्की मालक आपले एजंट नेमतात. ते भागा भागात बसून मटका घेतात. मटका खेळणारे तर सामान्य-अतिसामान्य असे असतात. ते मटका बिनदिक्कीत खेळतात आणि संबंधित पोलीस ठाण्याला मात्र याची काहीच खबर नसते. असे होऊ शकते का? कोल्हापूर शहरातील काही मटका मालक परागंदा असले, तरी काहींनी पुन्हा हे धाडस केले आहे. करवीर, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव, हुपरी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरळीत सुरु आहे. गांधीनगरमधील एका मालकाकरवी हद्दीतील सर्व मोठ्या गावात धंदा सुरु आहे. शिरोलीमध्ये दोन बंधूनी आपला पिढीजात व्यवसाय समजून आपल्याकडील तयार यंत्रणा कामाला लावली आहे. कोल्हापुरातील एक मालकही शिरोलीत नशीब अजमावत आहे. हुपरी परिसरात दोन मालक पुढे सरसावले आहेत.

आता यावर काहीच कारवाई होत नाही असे नाही. फरार मटकाकिंग बंधूंना बेड्या ठोकणाऱ्या स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मटका व्यवसायावर किरकोळ कारवाया सुरू आहेत. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तावडे हॉटेल परिसरात एक कारवाई झाली. करवीरमध्येही काही कारवाया झाल्या. पण शिरोली, हुपरीसह सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना न दिसणारा मटका मालक, एजंट, खेळणारे आणि त्याकडे कानाडोळा करणारे यांच्यासाठी पर्वणी ठरत आहे.