कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील सिंधु मौनेश्वर सुतार (वय ४०) हिने राहत्या घरातील अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ मार्चला मध्यरात्री घडली. याबाबतची वर्दी संजय गोविंद सुतार यानी येथील पोलिसांमध्ये दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, सिंधु दोन महीण्यापूर्वी बाळंत झाली असून तिला लहान बाळ आहे. तसेच बाळंतपणानंतर तिच्या पोटात दुखत असल्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, ही आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा आरोप सिंधुच्या नातेवाईकांनी करत आज (गुरुवार) शवविच्छेदन करण्यासाठी विरोध केला.
यावेळी पोलिसांनी तक्रारदारांना समजावत घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. या घटनेमुळे दत्तवाड आणि येथील शवविच्छेदन केंद्राजवळ काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.