शिरोळ (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे पाच वर्षापूर्वी प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृणमयी (वय ५) आणि मृणाली (वय ४) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. 

आज (मंगळवार) सकाळी जांभळी ओढ्यालगत असणाऱ्या आनंदा चव्हाण यांच्या  सामाईक क्षेत्रात असणाऱ्या विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती शिरोळ पोलिसांना दिली. यावेळी पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी घटनास्थळाकडे धाव घेवून पाहणी केली. दरम्यान, सुप्रियाचे  पती शिवाजी भोसले यानी सोमवारी पत्नी आणि दोन मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरोळ पोलिसात दिली होती. विहिरीतील दोन मृतदेह शोधण्यासाठी वजीर रेस्क्यू फोर्स आणि स्थानिक युवकांना पाचारण करण्यात आले. वजीर रेस्क्यू फोर्सच्या दशरथ शिकलगार, रऊफ पटेल, राजगोंडा पाटील, हैदर मुजावर यांनी हे तीनही मृतदेह विहीरीतून बाहेर काढले.

सुप्रिया भोसले ही काल (सोमवार) दुपारी अंगणवाडीला जावून येतो असे सांगून दोन मुलींना घेवून घरातून बाहेर पडली. मात्र, त्या तिघीही सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निदर्शनास आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विवाहितेची मुलींसह आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. आपल्या दोन मुलींसह आईने केलेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात आणि गावात हळहळ व्यक्त होत आहे.