जालना ( वृत्तसंस्था ) सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे.

वारंवार उपोषण केल्याने शरीर त्यांना साथ देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळी डॉक्टर आले असता, जरांगे पाटील यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली नाही. त्यामुळे स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ( 12 फेब्रुवारी ) रोजी तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावाली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद पाळत सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधणार आहे.

आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी ही म्हटलं आहे की, महाराष्ट्र बंदचा निर्णय हा सकल मराठा समाजाची भूमिका असेल तर मी समाजाबरोबर आहे. समाजाने एखादी भूमिका घेतली असेल तर मी समाजाच्या पुढे नाही असे पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.