जालना ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी शर्थीची झुंज देत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अन्न पाण्याचा त्याग करत आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. त्यांना बोलताही येत नाही. तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मराठा नेते मनोज जरांगे पाटील स्वतःवर उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजातील लोक नाराज दिसत आहेत. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी जालना येथून जिल्हा डॉक्टरांचे पथक आंतरवली येथे रवाना झाले आहे. अशा स्थितीत डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे पाटील यांना तपासासाठी विनंती केली. मात्र, सर्वप्रथम जरांगे यांनी डॉक्टरांच्या पथकाकडून ‘तत्काळ कायदा करा’ अशी मागणी केली. यानंतर डॉक्टरांचे पथक परत गेले.

20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनाची शक्यता

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे एक दिवसीय विशेष सत्र असेल.या एकदिवसीय विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत कायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठा समाजाने आमचा अंत पाहू नका तातडीने अध्यादेश काढा अन्यथा पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागेल असं म्हटलं आहे.