कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : नव्याने होऊ घातलेल्या विद्युत अभियंत्यांना वीज यंत्रणेची ओळख व्हावी, त्यांना त्यातील बारकावे समजावेत तसेच महावितरणच्या सध्या सुरु असणाऱ्या विविध योजना, बिलिंग पद्धत्ती तसेच टीओडी मीटर अशा विविध विषयांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अशोकराव माने पॉलिटेक्निक कॉलेज वाठार येथे डिप्लोमा करत असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसोबत (दि.११ ऑगस्ट रोजी) संवाद साधला.

विद्यार्थ्यांशी महावितरणचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) म्हसु मिसाळ व उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांनी ‘रिसेंट ट्रेंड्स इन पॉवर सिस्टम’ या विषयांतर्गत विविध मुद्दांवर संवाद साधत मार्गदर्शन केले व त्यांच्या विविध शंकांचे समाधान केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज गुरव व विविध विषयांचे प्राध्यापक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पंतप्रधान सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप आदी योजनांची माहिती देऊन ऊर्जा क्षेत्रात अपारंपरिक ऊर्जेचे वाढत जाणारे महत्व, टीओडी स्मार्ट मीटर व त्याद्वारे वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ग्राहकांना मिळणारी वीज दरातील सूट, वीज क्षेत्रातील बदलत जाणारे तंत्रज्ञान, महावितरण मोबाईल ॲप, वीज बिल वाचण्याची पद्धती, वीज बचतीचे उपाय आदी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आपल्या सभोवतालच्या ग्राहकांचे टीओडी स्मार्ट मीटर संदर्भात प्रबोधन करण्याविषयी विद्यार्थ्यांना विनंती करण्यात आली.