कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली जिल्हयामधील जनावरांच्या लम्पी साथीवर त्वरित उपाययोजना करण्याबाबत व लम्पी साथीमधील मृत जनावरांना आर्थिक मदत देण्याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन चर्चा केली. यावर मंत्री विखे-पाटील यांनी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात येऊन आढावा घेणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांना सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील जनावरांमध्ये लम्पी स्किनची साथ पसरली आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील गाय व बैलांना लम्पीची लागण झाली आहे. जिल्हयामध्ये सुमारे ८ लाखांवर पशुधन आहे. विशेषत: गोवर्गीय जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येत आहे; परंतु अपुरा कर्मचारी वर्ग व उपचारासाठी लागणाऱ्या साधनांचा पुरेसा अभाव यामुळे उपचार करताना शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हयामध्ये ११ ते १२ हजार खाजगी पशुवैद्यक सेवा देत आहेत. लम्पी आजाराबाबत त्यांना अपुरे ज्ञान असल्यामुळे जनावरांवर उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत.

लम्पी साथीने ग्रस्त असणारे अनेक मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे ही साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा व पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी साथ रोखण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवावी व लागणारी साधन सामग्री शासकीय यंत्रणेस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.