कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यामुळेच राहुल आवाडे यांच्याऐवजी माजी आ. अमल महाडिक यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे कोल्हापूर विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली होती. परंतु, ऐनवेळी त्यांचे नांव वगळून अमल महाडिक यांच्या नांवावर भाजप नेत्यांनी शिक्कामोर्तब केला.

दरम्यान, इचलकरंजीतील ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी राहुल आवाडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देऊन विधान परिषदेला सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर आवाडे गटाने सकारात्मकता दाखवत भाजपला पाठिंबा जाहीर केला. यावरून आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.