देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर पर्यटनस्थळाकडे सध्या पर्यटकांचा कल वाढला आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने मुंबई, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरातसह इतर भागातलेही पर्यटक कुणकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. मात्र, पर्यटकांनी आपल्या गाड्यांचे पार्किंग रस्त्यातच केल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला असून पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले.

श्री देव कुणकेश्वर येथील महादेवाचे दर्शन झाल्यानंतर समुद्रकिनारी पर्यटक मौजमजा करत निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. काही ठिकाणी देवगड हापूसची चव चाखतानाही पर्यटक दिसत आहेत. त्यामुळे येथील व्यवसाय देखील तेजीत झाले आहेत. सद्या देवगड तालुक्यात पर्यटकांचा कल वाढलेला दिसत. आहे त्यामुळे येथील हॉटेल, लॉजिंग देखील फुल्ल झाले आहेत.

मात्र, आलेल्या पर्यटकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केल्यामुळे या मार्गाने देवगडकडे किंवा मालवणकडे मार्गस्थ होणाऱ्या वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण झाल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्यामुळे येथील वाहनचालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार्किंग व्यवस्था केली जात आहे. परंतु, त्यावर व्यवस्थित नियंत्रण नसल्याने कुणकेश्वरमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा सातत्याने होताना दिसत आहे.

पोलीस प्रशासनाने याठिकाणी वाहतूक पोलीस किंवा हाँगर्डची नेमणूक करणे आवश्यक असताना देखील पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या पर्यटन हंगाम असल्याने गर्दीच्या ठिकाणी होमगार्ड किंवा ट्राफिक वाहतूक पोलीस तैनात करणे आवश्यक आहे.

परंतु, अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण पुढे करत ते टाळले जात आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसच नसल्याने किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले पहायला मिळत आहे.