कोल्हापूर (प्रतिनिधी) : वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन, अमॅच्युअर योगा थायलंड आणि योगा कल्चर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने थायलंडमधील बँकॉक येथे पार पडलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत कोल्हापुरातील गोपालकृष्ण कालेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना पारंपरिक योग स्पर्धा प्रकारात 40 ते 50 वयोगटात रौप्यपदक पटकावले.

बँकॉक येथे झालेल्या या योग स्पर्धेत थायलंड, लाओस, भारत, कंबोडिया, इंडोनेशिया या देशांचे 92 खेळाडू व परीक्षक उपस्थित होते.

पारंपरिक योगा या प्रकारात कोल्हापूरच्या गोपालकृष्ण कालेकर यांनी हस्त पादासन, फोर अँगल, लिझार्ड व्हेरिएशन आणि ट्विस्टिंग गॉडेस या योगासनांचे प्रात्यक्षिके सादर केली. या स्पर्धेचे उद्घाटन तनापुरम अनयाविर्यचाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुरेश गांधी, डॉ. श्रीकांत वाराणकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून मोहित कुमार (थायलंड) सुदीपकुमार (कंबोडिया) सुनील शिंदे, पंकज कुंडे (भारत) यांनी काम पाहिले.