कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही. ऑक्सिजन उपलब्धतेसाठी प्रशासन प्रयत्नशील राहील,  अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ना. पाटील म्हणाले की, कोरोनाच्या रूपाने महाराष्ट्रासमोर एक संकट उभे आहे. पण, महाराष्ट्र या संकटाला खंबीरपणे आणि संयमाने सामोरे जात आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल. लवकरच आपण सर्वजण मिळून या संकटावर नक्कीच मात करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात अव्वल करू, असा विश्वासही पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावर गोंधळाचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. १८ वर्षावरील २०० जणांचे आज प्रायोगिक तत्वावर लसीकरण करणार असून जिल्ह्यातील ५ केंद्रावर २०० जणांना ही लस ७ दिवस दिली जाणार आहे, असेही  त्यांनी यावेळी सांगितले.