कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावरील रेगे तिकटी रस्त्याची वारंवार दुरवस्था होते. यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर काल (सोमवार) महापालिकेला जाग आली. रेगे तिकटी रस्त्याचे काम पूर्ण झाले. अनेक दिवसांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना हायसे वाटले, मात्र कालच केलेला हा रस्ता महापालिकेने ड्रेनेज कामासाठी आज (मंगळवार) जेसीबीने खोदला. त्यामुळे रेगे तिकटी रस्त्याचे उजळलेले भाग्य एका दिवसांत खड्ड्यात गेले, असेच म्हणावे लागेल.

वास्तविक गंगावेश ते शिवाजी पूल हा कोल्हापुरातील महत्त्वाचा मार्ग. या रस्त्याची वारंवार दुरवस्था होते. यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर या रस्त्याचे काम होत असे, पण ते निकृष्ट दर्जाचे असे. रस्त्याची दुरुस्ती किंवा नवा रस्ता करण्यापूर्वी कृती समितीने ड्रेनेज व पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष करीत रेगे तिकटी येथील पाण्याची गळती न काढता रस्ता पूर्ण केला. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना समाधान वाटले, मात्र, आज (मंगळवार) पुन्हा नवा केलेला रस्ता जेसीबीने खोदण्यात आला. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.  जनतेच्या पैशातून केलेला खर्च तर वाया गेलाच, आता पुन्हा रस्ता करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे, याला जबाबदार कोण, असा सवाल परिसरातील नागरिकांतून होत आहे.