मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभागामार्फत राज्यात केरळ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. केरळसोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यातील शिक्षण पॅटर्नमधील यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत.

शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या तयारीत आहे. केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.

महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिंदे फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची टीम देशातील अशा राज्यात गेली जिथे शिक्षणात नवीन प्रयोग केले जाताय. ज्या राज्यांनी शिक्षणात प्रगती झाली आहे त्या राज्यातील पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामध्ये केरळ पॅटर्नवर विशेष काम केले जाईल. सोबतच राजस्थान आणि पंजाबमधील मॉडेलचा देखील विचार यामध्ये केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.