कागल  (प्रतिनिधी) :  केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ७५ कोटी रुपये अर्थसहाय्य केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील ७५० बेरोजगार युवकांना उद्योगधंदे,  व्यवसाय,  स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचे  त्यांनी सांगितले.

कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक व आरोग्य राज्यमंत्री डॉ.  राजेंद्र पाटील- यड्रावकर होते.

मुश्रीफ पुढे म्हणाले की,  मराठा समाजासह ओबीसी, कुणबी, मागास व भटक्या समाजाच्या बेरोजगार तरुणांनाही उद्योगधंदे व व्यवसायासाठी बँक कर्ज पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी देणारी  देशातील ही पहिली व एकमेव बँक आहे.

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,  इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, संत रोहिदास विकास महामंडळ योजनांमधूनही जोपर्यंत सरकार या योजनेचे व्याज देत राहील, तोपर्यंत तब्बल ५०० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्याचीही बँकेची तयारी आहे.

यावेळी प्रकाशराव गाडेकर,  अशोकराव नवाळे,  प्रवीणसिंह भोसले,  दिनकरराव कोतेकर,  रमेश माळी,  अनिल चव्हाण, विकास पाटील,  रमेश पाटील आदी उपस्थित होते. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी  प्रास्ताविक  केले.  बँकेचे कागल तालुक्याचे विभागीय अधिकारी शंकरराव निंबाळकर यांनी स्वागत केले. कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी  आभार मानले.