बेंगलोर ( वृत्तसंस्था ) बिहारमधील जातनिहाय जनगणनेच्या अहवालामुळे देशातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधक देशातील इतर राज्यांमध्ये जात जनगणना करण्याचे आश्वासन देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात सिद्धरामय्या यांच्या सरकारवर 2015 मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाबाबत हल्ला होत आहे.


कोंडीत अडकलेल्या सीएम सिद्धरामय्या यांच्या समोर यावर निर्णय घेणे मोठे आव्हान बनले आहे, आता ते कोणाचे ऐकणार ? विरोधी पक्षात बसलेला भाजप अहवाल जाहीर होण्यापूर्वी जातीनिहाय फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहे. भाजपने ज्येष्ठ लिंगायत समाजाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पक्षाचे अध्यक्ष बनवले आहे. आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी वोक्कलिंगा आमदारावर सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपने जातीनुसार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. केंद्राच्या दबावानंतर निवडणुकीच्या राजकारणातून हकालपट्टी झालेले लिंगायत नेते येडियुरप्पा यांनी पक्षात आपला उत्तराधिकारी बसवला आहे.