वर्धा (वृत्तसंस्था) : येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची आज निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे मराठी साहित्य संमेलन विदर्भात व्हावे अशी मागणी होत होती. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ साहित्य संघाला मिळाला आहे.

वर्धा-सेवाग्राम-पवनार ही गांधी-विनोबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या संमेलनासाठी गांधीविचारांवर लेखन करणाऱ्या लेखकाची अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असा एक मतप्रवाह आहे. वर्धा येथे साहित्य संमेलन होणार असल्याने ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, आजच्या बैठकीत चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून, वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते १९६१-६२ मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे विश्वस्तही आहेत.