शिंगणापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सदस्यांचे लक्ष लागून राहिलेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. महिला व बालकल्याण समिती, बांधकाम, समाजकल्याण आणि शिक्षण व अर्थ समिती या चार महत्त्वपूर्ण समित्यांच्या सभापतीपदी महिलांना संधी मिळाली. विशेष म्हणजे शिंगणापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या अपक्ष सदस्य रसिका अमर पाटील यांची शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. यामुळे कार्यकर्त्यांनी जि.प. आवारात तसेच शिंगणापूर (ता. करवीर) येथे  आनंदोत्सव साजरा करीत जल्लोष केला.  

रसिका पाटील यांचा मतदारसंघात चांगला संपर्क असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांना प्रत्येक बाबतीत साथ दिली आहे. यामुळेच त्यांनी रसिकाला शिक्षण व अर्थ समिती सभापतीपद भूषविण्याची संधी दिली आहे. त्या ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांचे पती अमर पाटील यांनी निवडीनंतर व्यक्त केला.

जर राष्ट्रवादीच्या वाट्याला अध्यक्षपद गेले तर उपाध्यक्षपदी रसिका पाटील यांची वर्णी लागेल अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती. पण अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. मात्र कोणतेतरी एक सभापतीपद रसिका पाटील यांना मिळणार हे निश्चित होते, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.