गेल्या काही वर्षात भोंदू बाबांनी केलेले कारणामे अन् त्यांना झालेल्या शिक्षा चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणातील कुख्यात जलेबी बाबाने तब्बल १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. हा नराधम चहामध्ये गुंगीचे औषध टाकून महिलांना प्यायला द्यायचा आणि बेशूद्ध झाल्यानंतर बलात्कार करायचा. त्याचा आज निकाल लागला असून न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिक्षा झालेला भोंदूबाबाने १९८४ मध्ये जिलबी विकण्याचा व्यवसाय सुरु केला. या व्यवसाय त्याने अनेक वर्षे केला होता. त्यानंतर २० वर्षांपूर्वी त्याने फतेहाबाद येथील टोहाना येथे एक मंदिर बांधलं व तंत्र-मंत्र करत रुग्णांना बरं करतो असा दावा करु लागला. इथूनच त्याच्या अंधश्रद्धेच्या कामाची सुरुवात झाली.

२०१८ मध्ये या तथाकथित बाबाविरोधात पहिली तक्रार दाखल झाली होती. एका नंबरवर एमएमएस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला. यानंतर पोलिसांना जलेबी बाबाच्या दुष्क्रत्याचे १२० व्हिडिओज मिळाले. यामध्ये तो चहामध्ये गुंगीचे औषध टाकून महिलांना प्यायला द्यायचा आणि बेशूद्ध झाल्यानंतर बलात्कार करायचा. हद्द म्हणजे याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. तेच व्हिडिओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर पुन्हा अत्याचार करायचा. न्यायालयाने त्याला १४ वर्षांचा तुरुंगवास आणि ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही शिक्षा जेव्हा सुनावली गेली तेव्हा शेकडो महिलांनी आनंद व्यक्त केला.

अन् तो भोंदू बाबा झाला

जलेबी बाबाचे खरे नाव बिल्लूराम असे आहे. त्याला चार मुली आणि दोन मुलं आहेत. तो ८ वर्षांचा असताना बिल्लू घरातून बाहेर पडला. दिल्ली रेल्वे स्थानकावर फिरत असताना त्याची भेट बाबा दिगंबर रामेश्वर यांच्याशी झाली. त्यांना गुरु मानून तो उज्जैन येथील त्यांच्या आश्रमात गेला अन् बाबा झाला.