कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कागवाड-गणेशवाडी मार्गावर कर्नाटक पोलिसांनी दूध पावडरवर कारवाई केल्यानंतर अनेक कारणामे उघडकीस आलेली आहेत. कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यातून जयसिंगपुरात येणारी दूध पावडर थेट नवी दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली चालाखी यानिमित्ताने समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात इचलकरंजी जवळ असणाऱ्या एका गावातील व्यापाऱ्याचे तसेच जयसिंगपूर शहरातील एका बड्या व्यापाराचे संगणमत असून शहरातील सांगली-कोल्हापूर रोडवर असणाऱ्या एका पेट्रोल पंपाच्या मागे हा काळाबाजार चालत असल्याची चर्चा सुरु आहे. कर्नाटकातून ही पावडर गणेशवाडीमार्गे जयसिंगपूर शहरात आणली जाते. त्यानंतर या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाची कारवाई होऊ नये यासाठी सदरचे दूध पावडरच्या पॅकिंग फोडून २५ किलोच्या बॅगेत पॅकिंग केले जाते.

त्या पॅकिंगवर एका स्थानिक दूध संस्थेचे लेबल लावून जीएसटी भरून त्या बॅगा थेट नवी दिल्लीला पाठवले जात असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व प्रकरणात जयसिंगपूर येथील एका बड्या व्यापाऱ्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. जयसिंगपूरमधील सांगली-कोल्हापूर मार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागे मोठे गोडाऊन असून शहरात इतर ठिकाणीही काही गोडाऊन असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न औषध प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे का..? असा सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.