कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीच्यावतीनं एकत्रित लढविली जाणार आहे. पुणे मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आज (गुरुवार) काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी घेतल्या.

इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह दुपारपासूनच कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी समर्थकांनी घोषणाबाजी केली. एच. के. पाटील, पालकमंत्री ना. सतेज पाटील, ना. विश्वजीत कदम, निरीक्षक सोनल पटेल, मोहन जोशी यांनी इच्छुक उमेदवारांना विविध प्रश्न विचारून त्यांची मते आजमावून घेतली.

शिक्षक मतदारसंघातून कोल्हापुरातील करणसिंह सरनोबत, भरत रसाळे, रेखा पाटील, दादासो लाड, बाबासो पाटील, जयंत आजगावकर, तानाजी नाईक, जतमधील सुजाता चौखंडे माळी, शिरोळमधील खंडेराव जगदाळे, पुणे येथील जी. के. थोरात व प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. तर पुणे पदवीधरसाठी कोल्हापुरातील  भरत रसाळे, इचलकरंजीतील शशांक बावचकर तर पुणे येथील डॉ. राजेंद्र खेडेकर यांचा समावेश आहे.

आज पार पडलेल्या मुलाखतीनंतर दोन्ही मतदारसंघासाठी योग्य उमेदवारी कोणाला द्यायची याबातचा निर्णय वरिष्ठ पातळीवर करण्यात येणार आहे. त्यामुळं उमेदवारी कोणाला मिळणार याची धाकधुक इच्छुकांसह समर्थकांना लागून राहिली आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतूराज पाटील, राजूबाबा आवळे, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, दिनकरराव जाधव, देविदास बनसाळी, संदीप कुमार, सरलाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.