मुंबई (प्रतिनिधी) : आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे शासन निर्णय तातडीने जारी केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.​​​​

दहीहंडीचा उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविदांना अपघात होऊन काही गोविंदांना किरकोळ तर काही गोविंदांना गंभीर दुखापत होत असते. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हा शासन निर्णय दर वर्षासाठी लागू राहील. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वा पालन न करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचनाही शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आली आहे.