गुवाहाटी (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. मंगळवार, दि. १० जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत असून, टी-२० मालिकेदरम्यान ते विश्रांतीवर होते. त्यात यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असल्याने ही एकदिवसीय मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 

बऱ्याच कालावधीनंतर दुखापतीमुळे बाहेर असलेला जसप्रीत बुमराह हा खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात परतणार होता, पण ऐन सामन्याच्या एक दिवस आधी बुमराह हा श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळणार नाही. बीसीसीआयला जसप्रीत बुमराहबाबत कोणतीही घाई नको आहे. बुमराह संघातील इतर खेळाडूंसोबत गुवाहाटीला पोहोचलेला नाही. भारताला गुवाहाटीमध्येच श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना होत आहे.

जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो टी-२० विश्वचषकही खेळू शकला नाही. यानंतर, त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम केले आणि त्याला तंदुरुस्त घोषित देखील करण्यात आले. एनसीएने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय संघात समावेश केला होता, परंतु आता अचानक त्याला अधिक विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. ही मालिका १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराहचा फिटनेस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याव्यतिरिक्त भारताला विश्वचषकही खेळायचा आहे. दुसरीकडे, जर संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला, तर तिथेही बुमराहची भूमिका महत्त्वाची असेल.