कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उप जिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील आग प्रतिबंधात्मक आणि विद्युत पुरवठा यंत्रणेचे ऑडीट करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत. समित्यांकडून केलेल्या ऑडीटचा अहवाल सात दिवसात सादर करावा, असा आदेश असे जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले आहेत. 

सीपीआरसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीमध्ये सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी रणजित चिले, सीपीआरचे डॉ. उल्हास मिसाळ तर सदस्य सचिव म्हणून सीपीआरचे अधीक्षक डॉ. राहूल बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. चौगुले, इचलकरंजी नगरपालिका विभागाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र मिरगे तर सदस्य सचिव म्हणून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविकुमार शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सदस्य म्हणून गडहिंग्लजमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मांजरेकर, कोल्हापूरमधील सार्वजनिक बांधकामाच्या विद्युत उपविभागाचे उपअभियंता सी. बी. चाकोते, गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशम दलाचे रविनंदन जाधव तर सदस्य सचिव म्हणून गडहिंगलज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक आंबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समित्यांनी रुग्णालयामधील आगसंरक्षक यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही करणे, रुग्णालयातील आगसंरक्षक यंत्रणा सुस्थितीत असल्याचे ऑडीट करणे, रुग्णांलयातील इलेक्ट्रिकल फिटिंग सुस्थितीत असल्याचे ऑडीट करणे, ऑडीटमध्ये ज्या त्रुटी आढळल्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करणे. उपाय योजना सूचविणे, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयास सूचना देणे आणि आवश्यकतेप्रमाणे खासगी यंत्रणेकडून सल्ला घेणे असे कामकाज करावयाचे आहे.