मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झालेले दिसून आले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता, महायुती सरकारने घेतली दक्षता’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.

राज्य विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाच्या सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानभवन परिसरात राडा पाहायला मिळाला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं सुरु असतानाच विरोधकही निदर्शने करायला पायऱ्यांवर आले.

सत्ताधारी महायुतीचे नेते पोस्टर घेऊन पायऱ्यांवर उभे होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भरतशेठ गोगावले यांना ‘ही आमची जागा आहे’ असे म्हणत निदर्शने करण्यावरुन डिवचले. तर सचिन अहिर यांनी गाजर देत प्रतिकात्मक आंदोलन केले.