अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच पक्षांकडून जाहिरातबाजी होताना दिसत आहे. तर प्रचारात हटके टॅग लाईनचा वापरही केला जात आहे. सद्य मोदींची गॅरंटी ही टॅग लाईन सर्वत्र चर्चेत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ बोलताना भाजपच्या 400 पारच्या घोषणेचा समाचार घेत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोदी गॅरंटी नाही, तर ठाकरेंची गॅरंटी चालते, असा हल्लाबोल केला.

दरम्यान, महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज अहिल्यानगर गांधी मैदान येथे सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपासह शिंदे गटावर निशाणा साधला.


सभेला संबोधित आदित्य ठाकरे म्हणाले की, लंके मी तुमच्यासाठी इथे आलो, तुमचं दिल्लीसाठीचं बुकिंग आता करून आलो आहे. निलेश लंके म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस आहे. कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्यांना मदत केली. निलेश लंके साधारण कुटुंबातील व्यक्ती असले तरी त्यांनी सहा तालुक्यात आपले अस्तित्त्व निर्माण केले आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच उपस्थित मतदारांना उद्देशून शेतकऱ्यांवर लाठीचार करणारी, अश्रू धुर सोडणारी भाजपा तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

तसेच भाजपच्या 400 पार घोषणेचा समाचार ही आदित्य ठाकरे यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले की, 400 सोडा 200 ही जागा भाजपाच्या येणार नाहीत. भाजपाचं सरकार परत आलं, तर ते तुमच्या घरात घुसेल. कारण ते घरफोडे आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वएकत्र काम करतोय. आमची ताकद जास्त आहे म्हणून विरोधकांमध्ये खेचाखेच सुरू आहे. महायुतीमधील भांडण काही सुटत नाही, त्यांना उमेदवार मिळत नाही. जे आहेत ते देखील उभ राहायला तयार नाहीत. कारण या महाराष्ट्रात मोदी गॅरंटी नाही, तर ठाकरे गॅरंटी चालते. देशात नारे खूप दिले जातात मात्र प्रत्यक्षात परिवर्तनाची एक वेगळी लाट वाहू लागली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.