टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील ‘त्या’ न्यायप्रविष्ट जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्येच्या पतीसह, त्याचा भाऊ यांच्याविरुद्ध शिरोली पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे. टोप येथील वेताळमाळ परिसरात गेल्या काही वर्षात अतिक्रमणे झाली आहेत. यामधील बाबासो प्रकाश लुगडे आणि अमृत दत्तात्रय पाटील यांच्यावर हा गुन्हा ग्रामविकास अधिकारी यांनी दाखल केला आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, टोप येथील वेताळमाळ परिसरातील गट क्रमांक १२७४/१ या शासकीय जागेमध्ये घर बांधले आहे. यासाठी त्यांनी साडेसात गुंठे जागेत अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत त्यांना दोनवेळा अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भातील नोटीसाही दिल्या आहेत. असे असतानाही बाबासो लुगडे व अमृत पाटील यांनी (दि. १८) रोजी ग्रामविकास अधिकारी क्वांरटाईन झाले होते.
या मुदतीत यांनी आणखी पन्नास स्क्वेअर फूट जागेमध्ये खोदकाम करून मंदिर सदृश्य बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न केला. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते यांना याची माहिती मिळताच त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.