सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एक खळबळजनक घटना घडलीय. मांगले गावात पतीने पत्नीची हत्या केल्याची हादरवून सोडणारी घटना प्रकाशझोतात आली आहे. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असं मृत महिलेचे नाव आहे. तर मंगेश चंद्रकांत कांबळे याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत कोंबून ठेवल्याची माहिती समोर आलीय. काही दिवसांपासून मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाची देशभरात चर्चा असताना आता सांगलीतही असाच काहीसा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः पोलिसांनी शरण गेला. मंगेश आणि त्याची पत्नी प्राजक्ता मुंबईहून काही दिवसांसाठी गावी भावाच्या घरी राहायला आले होते. मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले – वारणानगर रस्त्यावर जोतीबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात भाड्याने राहणाऱ्या भावाकडे मंगेशचं कुटुंब चार दिवसांपूर्वीच आलं होतं. मंगेश पत्नीबरोबरच सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या घेऊन मुंबईहून गावी रहायला आला होता.