कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघासाठी २ मे रोजी होणारी निवडणूक अतिशय अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत असलेला मतदार जिल्ह्यातील प्राथमिक दूध संघाचा प्रतिनिधी आहे. काही अपवाद वगळता सामान्य कुटुंबातील असलेल्या या मतदारांकडे मते मागण्यासाठी येणारे दिग्गज उमेदवार या मतदारांसाठी प्रचंड मानसिक दडपणाचे कारण बनत आहेत.

गोकुळ निवडणुकीत मत कोणाला द्यायचे हे जरी मतदाराने आधीच ठरवले असले तरी अतिशय तुल्यबळ असलेल्या दोन्ही आघाडीतील दिग्गज उमेदवार जेव्हा मत मागण्यासाठी दारात येतात तेव्हा त्यांना नेमके कसे सामोरे जायचे हेच त्या मतदाराला समजत नाही अशी परिस्थिती आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी अनेक मतदार उमेदवारांच्या घरातील किंवा अगदी जवळचे असलेले मतदार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाची वाट पाहात ‘निवांत’ आहेत. अर्थात, बहुसंख्य मतदार खेडेगावातील दूध संस्थांचे प्रतिनिधी आहेत. ग्रामीण संस्कृतीतील आणि साधे, सरळ जीवन जगणारा, शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करणारा हा मतदार गोकुळ दूध संघाशी जोडला गेला आहे. गोकुळमध्ये मतदान करण्याची मिळालेली संधी त्यांच्यासाठी निश्चितच पर्वणी आहे.

यापूर्वी अलीकडील ‘गोकुळ’च्या काही निवडणुकीत ठरावधारकांना उमेदवाराकडून किंबहुना निवडणूक लढवणाऱ्या आघाडीकडून जो राजेशाही पाहुणचार मिळाला आहे त्याचे किस्से अजून चर्चेत आहेत. लहान-मोठ्या सहली, स्पेशल गाड्यांपासून विमानापर्यंत प्रवास, मोठ्या शहरातील आलिशान हॉटेलमधील वास्तव्य, मतदानापूर्वीच एक जाडजूड पाकीट अशी बडदास्त ठरावधारकांनी अनुभवली आहे.

या वेळी गोकुळच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट आहे. मतदारांना एकत्र करणे आणि त्यांची बडदास्त ठेवणे याला बंधने आली आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदार आपल्या घरी स्वतंत्र आहे. म्हणूनच दोन्ही आघाडीतील उमेदवारांना गावोगावी पायपीट करून मतदारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दोन्ही आघाडीकडून आपल्या हक्काची मते बांधून ठेवण्यासाठी ‘अर्थपूर्ण टोकन’ मतदारांपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे कोणाला मते द्यायची हे मतदारांनी ठरवले आहे. तरीही प्रचारासाठी आपल्या दारात आलेल्या उमेदवारांना डावलणे मतदारांना शक्य होत नाही. कारण गोकुळचा उमेदवार म्हणजे जिल्ह्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्व. त्यातच नेत्यांचा आधार आणि कार्यकर्त्यांची फौज घेऊन आलेल्या उमेदवारांना साधा, सरळ मतदार सामोरा जाताना निश्चितच गोंधळून जात आहे.

ज्याचे टोकन स्वीकारले त्या आघाडीचा उमेदवार असेल किंवा ज्यांना मतदान द्यायचे नाही असे उमेदवार असेल त्यांना हसतमुखाने सामोरे जायचे आणि मते देण्याची ग्वाही द्यायची हे मतदारांना करावेच लागत आहे. याशिवाय कधी नव्हे ते  इतक्या मोठ्या व्यक्ती दारात येतात, मताची याचना करतात तर त्यांचा पाहुणचार आणि विचारपूस करण्याची कर्तव्ये ही मतदाराला करावे लागत आहेत. त्याचाही एक वेगळाच दबाव मतदारावर पडत आहे.

याशिवाय सध्या कोरोनाचा प्रसार वाढला असताना अनेक गावे फिरत आणि अनेकांशी थेट संपर्क करीत दारात आलेल्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना घरात घ्यायचे तरी कसे आणि बाहेरच्या बाहेर गोळवण तरी कशी करायची, अशी मतदारांची द्विधा मन:स्थिती झाली आहे. म्हणूनच मतदान करण्यापेक्षा प्रचारासाठी दारात आलेल्या उमेदवारांना सामोरे कसे जायचे याचा प्रचंड मानसिक दडपण मतदारांवर आणि त्याच्या कुटुंबावर पडले आहे.