कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : शहराची हद्दवाढ झाल्यावर या भागात परप्रांतीयांचे लोंढे यायला नक्कीच सुरुवात होणार आहे. तसा अन्य शहरांचा अनुभव आहे. केवळ पुण्याचा विचार केला, तर आज तिथली परिस्थिती काय आहे. फक्त गर्दी आणि गर्दी. वाहनांची, माणसांची, उड्डाणपुलांची, आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या इमारतींची गर्दी दिसते.

भाजीपाला, दूध असो वा मटण-मच्छी त्याचे दर पुण्यात काय आहेत. ठिकठिकाणी परप्रांतीयांच्या विविध प्रकारच्या वस्तू आणि पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्या. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी जी संस्कृती आज आहे का? शांत शहर म्हणून अनेकजण पुण्यात वास्तव्याला येत असत. प्रदूषणाची स्थिती काय आहे? कोल्हापूरची प्रदूषणाची अवस्था काय आहे. एका अहवालानुसार दहा प्रदूषित शहरांमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. सामाजिक स्वास्थ्य कसे आहे? आज पुण्यात वयोवृद्धांना एकटे राहाणे अशक्य होऊन बसले आहे. कोण कधी येईल आणि हकनाक बळी घेऊन लूट करील, याची खात्री नाही. याचा विचार व्हायला हवा की नको.

शहराचा विस्तार झाला म्हणजे विकास म्हणायचे का? कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुठेच योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध नाही. गेल्या काही वर्षांत अनेक गावांत अस्ताव्यस्त बाजारपेठा वसल्या आहेत. कोणतेही नियोजन न करता बांधकामे झाली आहेत. हद्दवाढीत अशी काही गावे समाविष्ट झाली तर त्यांचे नियोजन कसे करणार. हद्दवाढ होऊन पुण्यात समाविष्ट झालेल्या गावांची काय स्थिती आहे. या गावांचा पूर्ण विकास व्हायला किती वेळ लागेल. सद्यस्थितीत पुण्यात स्थानिक ‘पुणेकर’ आणि बाहेरून पुण्यात रहाण्यासाठी आलेले यांच्यात पुणे इच्छुक असे दोन गट पडले आहेत. मूळ पुणेकर नव्यांना सामावून घ्यायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या गावांची मोठं खेडं अशी ओळख आहे. ती पुसून शुद्ध शहरीकरणाचा अट्टाहास कशासाठी ? कोणतेही गाव हद्दवाढीत न करता या गावांचा नियोजनपूर्वक सर्वांगीण विकास करणे आणि त्यांना शहराच्या  विकासाबरोबर आणणे अधिक सोयीचे होणार आहे. हद्दवाढीच्या अट्टाहासासाठी मारून मुटकून, बळजबरी करून, बस सेवा बंद करण्याची धमकी देऊन हद्दवाढीची गरज आहे का? कुणी तरी धमकी देण्याची ही कुठली पद्धत आहे.

आजूबाजूच्या गावांनी शहरवासीयांना भाजीपाला, दूधसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखला, तर शहरवासीयांची काय अवस्था होईल? सारासार विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. केवळ कुणी तरी हद्दवाढीची मागणी करतंय म्हणून हद्दवाढीचा घाट न घालणेच सोयीचे ठरेल.

मुळात निसर्गानेच हद्दवाढीला मर्यादा घातल्या आहेत. हेही लक्षात घ्यायला हवे. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यावेळीच मोठ्या शहराचे नियोजन केले असते. त्यांच्यापेक्षा जास्त कुणी दूरदृष्टीचा असेल, असे सध्या तरी दिसत नाही. केवळ राजकीय, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांच्या लाभासाठी कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होता कामा नये.

नगररचना, सांख्यिकी विभाग असे अनेक विभाग हद्दवाढीशी निगडित आहेत. त्या विभागाकडून माहिती घ्यायला हवी. अन्यथा लोकप्रिय घोषणा करून स्वार्थासाठी इतरांचा बळी देण्यात काहीच अर्थ नाही.

-ठसकेबाज