पेठवडगाव (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लवकरच ग्रामस्तरावर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येईल आणि नवी रणनीती आखण्यासाठी स्थानिक पातळीवर रणधुमाळी सुरु होणार आहे.

हातकणंगले तालुक्यातील ३९ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील ७७५० ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. निवडणुक होणाऱ्या ग्रामपंचायती अशा: साजणी, यळगूड, आळते, हिंगणगाव, मुडशिंगी, चावरे, निलेवाडी, टोप, कासारवाडी, रेंदाळ, रांगोळी लक्ष्मीवाडी, शिरोली, घुणकी, नवे पारगाव, संभापूर, भादोले, रूकडी, नागाव, सावर्डे, कोरोची, तळंदगे, जुने पारगाव, मजले, तारदाळ, अंबप, तळसंदे, मौजे वडगाव, चौकाक, हेरले, खोतवाडी, कापूरवाडी, माले.

या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे या निवडणुका चुरशीने होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुकीला महिनाभराचा अवकाश असला तरी गावागावातून गटातटांची बांधणी सुरू करण्यास नेतेमंडळींनी प्रारंभ केला आहे.