कागल (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक आणि माजी आ. संजयबाबा घाटगे या तीन नेत्यांचा एकोपा घडून आला आहे. यावेळी कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण ४९ मते आहेत. त्यापैकी ४३ मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या ९० टक्के मते ना. सतेज  पाटील यांना मिळणार आहेत. तर या निवडणुकीत सतेज पाटील यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास या तिन्हीही नेत्यांनी कागलमधील बैठकीत व्यक्त केला.

कागल तालुक्‍यात जि.प.चे सर्व म्हणजेच पाचही सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. पं.स. सभापतीपद ही महाविकास आघाडीकडेच आहे. कागल शहरातील २३ पैकी १७ नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत. मुरगुडमध्ये सर्व म्हणजेच २० नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत.

ना. मुश्रीफ म्हणाले, निवडणुकांमधून ज्या-ज्यावेळी कागल तालुका एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे ठाम उभा राहिलेला आहे. त्या त्या वेळी विजयाची माळ उमेदवाराच्या गळ्यातच पडलेली आहे.

खा. संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंडलिक आणि माजी आ. संजयबाबा घाटगे आम्ही सर्वजण एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम झाली आहे.

संजयबाबा घाटगे म्हणाले, महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी आम्ही एकदिलाने खंबीरपणे उभे आहोत.

कागलमध्ये झालेल्या  बैठकीला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर जि.प. सदस्य युवराज पाटील, अमरीश घाटगे, मनोज फराकटे, शिल्पा खोत,  शिवानी भोसले, कागल पं.स.चे सभापती रमेश तोडकर,  नगराध्यक्षा  माणिक  माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे आदी उपस्थित होते.