गांधीनगर (प्रतिनिधी) : पुणे येथील गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीची बनावट पॉलिसी देऊन फसवणूक केली. याप्रकरणी गांधीनगर मेनरोडवरील निगडेवाडी येथील अथर्व बजाज ऑटो शोरूमचे शरद कलगोंडा पाटील यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अथर्व बजाज ऑटो शोरूम निगडेवाडी मधून १६/११/२०१९ रोजी सिद्धार्थ राकेश गर्ग (रा. बेळगाव) यांनी दुचाकी घेतली होती. त्यांच्या गाडीचा क्लेम करण्यासाठी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीत फोन केला. माझी दुचाकी मोटरसायकल क्रमांक (केए २२ एचई ७४०५) ही दुचाकी गाडी गांधीनगर येथील अथर्व बजाज ऑटो शोरूम मधून शरद कलगोंडा पाटील यांच्याकडून खरेदी केली होती. त्यावेळी पाटील व इतरांनी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीची इन्शुरन्स पॉलिसी नंबर (डिओ १०८१०२३५) असा असून त्याचा कालावधी (२०/११/१९) ते (१९/११/२४) नमूद करून दिला. तसेच त्या पॉलिसीमध्ये इनव्हॉईस नंबर (आयए ००४६६२५४१) असा नमूद आहे.

पण प्रत्यक्षात सदरचा नंबर हा गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनी प्रणाली सिस्टीममध्ये चेक केले असता पॉलिसीचा नंबर (युपी ५५ आर ५७९५) या गाडीच्या पॉलिसीला लागू झाले असल्याचे समजले आहे. या पॉलिसीचे मालक शंकर जयस्वाल (रा. भिंमपुर सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) या इसमाच्या नावे रजिस्टर झाली आहे. या पॉलिसीची मुदत  (२/१२/२०१९) ते (१/१२/२०) अशी आहे त्या पाँलिसाचा नंबर (डी ००६९८१२१७) या पाँलिसीसी संलग्न दिसून आला.

त्यामुळे शरद कलगोंडा पाटील यांनी कंपनीचे नाव इनव्हॉईस नंबर वापरून ग्राहकांची आणि गो डिजिट कंपनीची फसवणूक केली आहे. अशी फिर्याद गो डिजिट कंपनीचे विक्रांत मनोहर व्यास (रा. पुणे) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.