कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डयांचे डिपॉझिट पूर्णपणे माफ करण्यात यावे. या मागणीसह इतर विविध मागण्या संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष किशोर घाडगे, सुशील भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) शिवसेना संयुक्त उत्तरेश्वर पेठ, बुधवारपेठ शुक्रवार पेठच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपायुक्त शिल्पा दरेकर यांना देण्यात आले.

यावेळी शहरात गणेश आगमन आणि विसर्जन होणाऱ्या मार्गावरील रस्त्यांचे काम युद्धपातळीवर करावे. गंगावेश ते शिवाजी पूल आणि गंगावेश ते इराणी खण हा मार्ग सुस्थितीत करावा. घरगुती गणेश मूर्ती विसर्जन कुंडाची ठिकाणे निश्चित करावीत. तरुण मंडळे आणि संस्था विसर्जन कुंडे करणार असतील तर त्यांना गणेश मूर्ती नेण्यासाठी वाहन व्यवस्था करावी. प्रत्येक विसर्जन कुंडाजवळ निर्माल्यकुंडाची व्यवस्था करुन त्याचा उठाव करावा. इराणी खण येथे तरुण मंडळाच्या गणेश मुर्ती विसर्जित होतात त्या ठिकाणी त्वरित पुरेशी विद्युत व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपयुक्त दरेकर यांनी या मागण्या अतिशय मौलिक असून त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

यावेळी रियाज बागवान, सनी अतिग्रे, राकेश पोवार, सागर कलघटगी, अनिकेत जाधव, शुभम बागल, रईस बागवान आदी उपस्थित होते.