कोल्हापूर : शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी हातकणंगले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने आधी घेतली होती. पण नंतर  ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला आणि आपला उमेदवार हातकणंगले मतदारसंघात दिला, असं राजू शेट्टी यांनी आज बोलताना सांगितलं.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी मला मशाल चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला होता. मशाल चिन्हावर लढायचं झाल तर एबी फॉर्म घेवून शिवसेनेत प्रवेश करावा लागला असता. पण असं करणं म्हणजे ही शेतकऱ्यांशी प्रतारणा झाली असती. मी शेतकऱ्यांना कधीही  वाऱ्यावर सोडू शकत नाही. मी स्वार्थासाठी राजकारण करत नसून करियर म्हणून मी कधीही राजकारण करत नाही असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

मी लढणारा कार्यकर्ता, जनताच निर्णय घेईल :

ठाकरे गटाकडून हातकणंगले मतदारसंघात उमेदवार उभा केला असला तरी, मला त्याचा काही फरक पडत नाही, मी लढणारा कार्यकर्ता असून लढणे हा माझा धर्म आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणालाही घाबरायचं नसतं.मागील लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मी मान्य केला होता. आता पुन्हा जनताच निर्णय घेईल. जनता माझ्यासाठी या निवडणुकीत निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल,असंही शेट्टी यावेळी म्हणाले.