कुरुंदवाड (प्रतिनिधी) : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेले संस्थेचे अध्यक्ष प्रताप आगरे यांना कुरुंदवाड पोलिसांनी ऐनापूर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथून बुधवारी पहाटे अटक केली. त्यामुळे अपहारप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.

दरम्यान आगरे यांना येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राजीव पतसंस्थेच्या ५ कोटी ५८ लाखांच्या अपहारप्रकरणी संस्थेचे लेखापरिक्षक संभाजी शिंदे यांनी दीड महिन्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सचिव आणि कॅशीयर अशा १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी अध्यक्षपूत्र शैलेंद्र आगरे, सचिव श्रीकांत हिंगणगावे व सोनार जयवंत महामुनी यांना यापूर्वीच अटक केली आहे.

यातील मुख्य आरोपी कॅशीयर महावीर मगदूम आणि अध्यक्ष आगरे यांना शोधण्यासाठी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दोन पथकाद्वारे शोध सुरू केला होता. या पथकात सागर खाडे, संतोष साबळे, सचिन पुजारी, नागेश केरीपाळे यांचा समावेश होता.