बंगळूर (वृत्तसंस्था) : कर्नाटकमधील बंगळुरु येथे एका 32 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्याच घरात बॅगेत भरुन ठेवल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उढाली आहे. मयत महिला ही महाराष्ट्रातील असून तिचं नाव गौरी खेडेकर असं आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून गुन्हा केल्यानंतर आरोपीनेच घरमालकाबरोबरच सासरवाडीलाही फोन करुन आपण पत्नीचा खून केल्याचं कळवल्याची माहिती समोर येत आहे. दोनच वर्षांपूर्वी गौरी आणि राजेशचं लग्न झालं होत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणानंतर गौरीचा पती राजेश राजेंद्र खेडेकर हा शहर सोडून पळून गेला. राजेशला बंगळुरु पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्याला बंगळुरु पोलिसांनी पुन्हा बंगळुरुला नेल्याची माहिती, पीटीआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिली आहे. गौरी आणि तिचा पती राकेश हे दोघे डोक्काकमानाहल्ली येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहायला आले होते. डेक्कन होराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच हे दोघे या ठिकाणी राहायला आलेले.