कळे (प्रतिनिधी) : वारनुळ (ता.पन्हाळा) येथे सांडपाणी निचऱ्यावरून ग्रामपंचायत व रहिवाशी यांच्यात जोरात जुंपली. दरम्यान, खुद्द सरपंच व ग्रामपंचायत शिपाई यांनी स्थानिकांना मारहाण केली. याबाबत कळे पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली.

वारनुळ ग्रामपंचायतीने गणेश गल्लीतील सांडपाणी श्रीमती रंजना मारुती पोवार यांच्या शेतीत सोडले आहे. सांडपाणी, प्लास्टिक कचरा यामुळे पिकाची नुकसानी होते. तसेच दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शेतकाम करण्यास मजूर येत नाहीत. सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीला वारंवार कळविले. पण दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे गत महिन्यात श्रीमती पोवार यांनी मातीचा भराव टाकून आपल्या शेतात येणारे सांडपाणी अडविले आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरली आहे. विठ्ठल धोंडीराम कोले यांच्यासह स्थानिक रहिवाश्यांनी ग्रामपंचायतीत तक्रार दिली. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व याठिकाणी असलेला जुनी पाईप बदलणे काम सुरू केले. दरम्यान, विठ्ठल धोंडीराम कोले व विठ्ठल मारूती पोवार यांनी काम अडविले व पाईपलाईन घालायची नाही. ‘तुम्हाला काय करायचे ते करा.’ असे म्हणून शिवीगाळ केली. याबाबत सरपंच सुरेश नारायण पोवार यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली.

तर विठ्ठल कोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सांडपाणी वाहून जाण्यासाठी याठिकाणी पूर्वीपासून लहान नळे घातले जातात. नळ्याचे तोंड बंद होऊन निचरा होत नाही. दुर्गंधी पसरते. त्यामुळे मोठे नळे घाला असे सांगत असता.’ आम्ही लहान नळे घालणार तू कोण आम्हाला सांगणार.’ असे म्हणून सरपंच सागर पोवार व शिपाई सुरेश पोवार यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार विठ्ठल कोले यांनी दिली आहे.