नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी जी जागा निर्धारित केली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पोहचावं, त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शेतकरी त्या ठिकाणी पोहचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करेल.

दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या पंजाब व हरियाणातल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलीसांनी दिल्लीच्या सीमेवरच रोखलं आहे. गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आहे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्लीच्या बुरारी मैदानावर शेतकऱ्यांनी हे आंदोलन करावं असं सरकारनं प्रस्ताव ठेवला होता. परंतु शेतकऱ्यांनी तो धुडकावला आणि रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.