मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याची चर्चा आहे. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेना भाजपपासून दुरावल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री वाढलेली पाहायला मिळत आहे. 

शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. नुकतेच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते. यानंतर राज ठाकरे यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी भेटीसाठी पोहोचले. या भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी कमालीची गुप्तता ठेवली होती. यामुळे या बैठकीबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. याआधी जुलै महिन्यात राज ठाकरेंवर जेव्हा नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले होते.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे समजते. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भेटीमागे नेमके काहीतरी मोठे आणि महत्त्वाचे कारण असू शकते, अशी चर्चा आहे. यापूर्वी देखील या दोघांमध्ये भेट झाली होती. त्या भेटीआधी माहिती देण्यात आली होती. आजच्या या भेटी संदर्भात दोघांकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती देण्यात आली नाही. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून कोणाच्याही भेटी-गाठी करत नव्हते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आल्याची चर्चा आहे.